नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांनी काल दुसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज मोदी यांनी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. अमित शहा यांच्याकडे गृह खाते सोपविण्यात आले असून, मागील सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्रिपद भूषवलेले राजनाथ सिंह यांना यावेळी संरक्षण खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे, तर अर्थ खात्याची जबाबदारी निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पीयूष गोयल यांना रेल्वेमंत्री करण्यात आले असून, नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते व परिवहन खात्याची तर रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी नव्याने मोदी मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले माजी विदेश सचिव एस. जयशंकर यांना परराष्ट्रमंत्रीपद तर मागील सरकारमध्ये मनुष्यबळ विकासमंत्री राहिलेले प्रकाश जावडेकर यांच्याकडे आता माहिती व प्रसारण मंत्रालय सोपवण्यात आले आहे. रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा, डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य मंत्रालय, स्मृती इराणी यांच्याकडे महिला व बालकल्याण खाते, नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे कृषी खाते, भाजपचा मित्रपक्ष लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्याकडे अन्न व वितरण मंत्रालय, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे पुन्हा सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. मागील मंत्रिमंडळात शिवसेनेचे अनंत गिते यांच्याकडे असलेली अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गिते हे 17 व्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास विभागाचे राज्यमंत्रिपद सोपविण्यात आले आहे. विदर्भातून भाजपकडून नितीन गडकरी व संजय धोत्रे या दोन नेत्यांना मोदी यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.